मल्चिंगने भुईमूग लागवड

भुईमुग…महाराष्ट्रातील एक महत्वाचे गळीत धान्य पीक. भारतात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये भुईमुगाची लागवड केली जाते. तसं पाहायला गेलं तर भारतात भुईमुगाची लागावड पारंपरिक पद्धतीनेच केली जाते. पण भारतात तसेच महाराष्ट्रात मल्चिंगने भुईमूग लागवड कशी करता येईल यावर संशोधन करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाबाबत माहिती घेऊया.

भुईमुगाचे पिक तिन्ही हंगामात घेतले जाते. खरिफ हंगामात भुईमुगाची पेरणी जुनच्या २ ऱ्या आठवड्यात किंवा जुलै च्या पहिल्या आठवड्यात केली जाते.  भुईमुगाची रब्बी पेरणी नोव्हेंबर महिन्यात करतात . तसेच उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान केली जाते.  महत्वाची बाब म्हणजे उन्हाळी भुईमुगाचे उत्पादन हे खरीपातील भुईमुगापेक्षा दुप्पट येते .

जमिन :

भुईमुग लागवडीसाठी चांगल्या मऊ, भुसभुशीत, वाळू मिश्रित, सेंद्रिय पदार्थ असलेली जळकी ते मध्यम जमीन चांगली असते.

पेरणी वेळ :

चांगल्या उगवनासाठी १९ डी.से. पेक्षा जास्त तापमान योग्य असते. जास्त थंडीच्या वातावरणात पेरणी करू नये. २१ अंश ते ३० अंश सेंटीग्रेड उष्णतापमान असल्यास भुईमुगाची वाढ चांगली होते.

अंतर :

नीमपसरी जात ९ बाय १८ इंच किंवा ९ बाय १२ इंच तर उपटी जातीसाठी ९ बाय १२ इंच किंवा ६ बाय १२ इंच असे अंतर ठेवावे.

बीज प्रक्रिया :

पेरणीपूर्वी एक किलो बियाण्यास थायरम २-३ ग्रॅम किंवा कार्बन्डझीम ३ ग्रॅम चोळावे त्यामुळे उगवण चांगली होऊन बुरशीजन्य रोगास प्रतिकार क्षमता वाढते.

जिवाणू संवर्धने :

पेरणी पूर्वी बियाण्यास जिवाणू संवर्धन लावल्यास उत्पादनात हमखास वाढ होते, त्यासाठी २० किलो बियाण्यास ५०० ग्रॅम रायझोबिन जिवाणू संवर्धक चोळावे.

लागवडीची पद्धत :

भुईमुगाची पेरणी टोकन पद्धतीने करावी, प्रत्येक टोकणीस १ किंवा २ बियाणे टाकावे. रुंद वरंबा व सारी पद्धतीने भुईमुगाची लागवड केल्यास उत्पादन वाढते.

पॉलीथीन मल्चिंग तंत्रज्ञान :

या तंत्रज्ञानाने शेती करण्यासाठी साधारण ७ मायक्रॉन जाडीचे पारदर्शक पॉलीथीन वापरावे. तज्ज्ञांच्या संशोधनानुसार भुईमूग लागवडीसाठी ७ ते २० मायक्रॉन दरम्यानचे मल्चिंग वापरले जाऊ शकते. भौगोलिक परिस्थिती आणि वातावरणीय स्थिती याप्रमाणे वापरण्यात येणाऱ्या मल्चिंग पेपरची जाडी निश्चित केली जाऊ शकते.

सर्वसाधारण एक एकर क्षेत्रासाठी ५ रोलची आवश्यकता भासते. एका रोलमध्ये ६ किलो इतका कागद असतो. कागदाची जाडी ७ मायक्रॉन एवढीच असल्याने त्यातुन आ-या सहजपणे खाली जातात. पॉलीथीन कागदामुळे जमिन झाकली जाते व बाहेरील गवताचे बियाणे जमिनीवर पडण्यास अटकाव होउन गवताची वाढ जवळपास २६ टक्क्यांनी कमी होते. त्याचबरोबर जमिनीचे तपमान वाढण्यास मदत होते परिणामी पेरणीच्या वेळी जमिनीचे तपमान कमी असले तरी बीयाणांची उगवण चांगली व ३ ते ४ दिवस लवकर होते.

कागद अंथरणे व पेरणी :

वरील प्रकारच्या कागदाची रूंदी ९० सेमी असते व त्यावरती बियाची टोकण करणेसाठी ४ सेमी साधारण १ इंच व्यासाची छिद्रे पाडावीत. स्प्रिंकलर सेटच्या साह्याने जमिन किंचीत ओली करून वाफ्यावरती कागद अंथरावा आणि दोन्ही बाजूस मातीत खोचुन घट्ट बसवावा कागदास छिद्रे नसल्याने लोखंडी/पी.व्ही.सी पाईपने ४ सेमी व्यासाची छिद्रे पाडावीत . निवड केलेल्या उन्हाळी भुईमुग बियाण्याची पेरणी करावी. दोन छिद्रांमधील अंतर  १५ ते २०  सेमी तर दोन ओळीत अंतर साधारण २० ते  ३० सेमी ठेवल्यास रोपांची वाढ चांगल्या पद्धतीने होते.

पॉली मल्चिंग च्या सहाय्याने भुईमुग शेती केल्यास दाण्याचा आकार वाढतो त्याचप्रमाणे उत्पादनात ५० टक्क्यांनी वाढ होते हि गोष्ट शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची आहे.

पाणी नियोजन :

पिकाच्या गरजेनुसार किंवा जमिनीच्या प्रतीनुसार पाणी द्यावे. पीक फुलाऱ्यावर येण्याच्यावेळी (पेरणीनंतर २५-३० दिवसांनी), आव्या सुटण्याच्या वेळी आणि शेंगा भरतेवेळी या पिकास पाणी देणे अत्यावश्यक असते.